पाटणा -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकाळात बिहारमध्ये जंगल राज ऐवजी जनता राज आले आहे. नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल आणि भाजप आघाडीचा राज्यात दोन तृतीयांश बहुमताने विजय होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या 'बिहार जनसंवाद रॅली'मध्ये आज अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलावर निशाणा साधला. आरजेडी सत्तेत असताना बिहारचा विकास दर फक्त 3.9 टक्के होता. मात्र, एनडीएच्या काळात बिहारचा विकास दर 11.3 टक्क्यांवर पोहचला आहे. बिहारमध्ये आता लँटर्न(कंदील) राज ऐवजी एलईडी राज आले आहे. आरजेडी पक्षाचे चिन्ह कंदील असून याद्वारे शहा यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली.