नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ३० मे'ला नरेंद्र मोदी २.० सरकारचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन येथे पार पडला. यावेळी २४ खासदारांनी कॅबिनेट आणि ३३ खासदारांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज (शुक्रवार) नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटप करण्यात आले. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्यवर्धन सिंह आणि गौतम गंभीर सारखे दिग्गज खेळाडू असतानाही क्रीडा मंत्रीपद त्यांना देण्यात आले नाही.
ऑलिंपिक आणि विश्वकरंडक विजेते खेळाडू असतानाही 'त्यांना' दिले नाही क्रीडा मंत्रीपद - ऑलिंपिक
मंत्रिमंडळातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्यवर्धन सिंह आणि गौतम गंभीर सारखे दिग्गज खेळाडू असतानाही क्रीडा मंत्रीपद त्यांना देण्यात आले नाही.
ऑलिंपिक रौप्यपदक विजेते राज्यवर्धन राठोड यांनी जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केली असतानाही मोदींनी अनपेक्षित धक्का देत किरण रिजिजू यांची क्रीडामंत्री म्हणून निवड केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी क्रीडामंत्री म्हणून भारतीय खेळाडूंसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. तसेच, त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन युवकांसाठी खेलो इंडिया ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली होती. या स्पर्धेद्वारे अनेक युवा प्रतिभावान खेळाडू समोर आले. त्यामुळे, राज्यवर्धन सिंह राठोड कायम राहतील, अशी शक्यता होती.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वकरंडक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने पूर्व दिल्लीतून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे, पहिल्याच कार्यकाळात गंभीरला मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.