नवी दिल्ली- मुनिरका भागात असणाऱ्या एका जुन्या इमारतीला, तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नांनंतर पाडण्यात आले. दक्षिण एमसीडी अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी ही कामगिरी पार पाडली. यानंतर आता, या इमारतीच्या मालकावर डीएमसी कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. या इमारतीमध्ये साधारणपणे ६० लोक राहत होते.
गुरुवारी झुकली होती इमारत..
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्यांना ही इमारत खचून झुकल्याची माहिती मिळाली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या आणि शेजारच्या आणखी दोन इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर ही इमारत पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली होती. अखेर, आज सकाळी ११ च्या सुमारास ही इमारत पाडण्यात आली. ही इमारत पाडताना शेजारील इमारतीचेही नुकसान झाले. या दोनही इमारतींचा मालक एकच आहे.