नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 18 एफआयआर दाखल केले असून 106 लोकांना अटक केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हिंसा करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आज दिवसभरात कोणतीही हिंसाचाराची घटना झाली नाही. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन दिल्ली पोलिसांकडून दिल्लीकरांना करण्यात आले आहे.
दंगलग्रस्त भागांवर ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येत असून मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. ज्या घरांच्या छतांवर दगड ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे दिल्ली पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी सांगितले.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्ली मागील 3 दिवसांपासून धगधगत आहे. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे.