बंगळुरू - मध्यप्रदेशातील काँग्रेसचे बंडखोर आमदार कर्नाटकातील बंगळुरू शहरामध्ये थांबले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या १९ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. यातील काही आमदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत राहण्याचा निर्धार या बंडखोर आमदारांनी व्यक्त केला.
तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, बिसाहूलाल साहू और इमरती देवी यानी पत्रकार परिषद घेतली. आम्हाला मजबूरीने काँग्रेस पक्ष सोडावा लागत आहे. राहुल गांधींनी आमचं म्हणणे एकले नाही. कमलनाथ यांच्याकडे दलाल आणि भ्रष्टाचाऱयांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र, आम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही, असे इमरती देवी म्हणाल्या. तर राज्यात मंत्र्यांपेक्षा अधिकाऱ्यांचे जास्त चालत असल्याचा आरोप सिलावट यांनी केला.
काँग्रेसच्या बंडखोर आमदार इम्रती देवी म्हणाल्या, की ज्योतिरादित्य सिंधिया आमचे नेते आहेत. त्यांनी आम्हाला खुप गोष्टी शिकवल्या आहेत. विहिरीत उडी मारण्याची वेळ आली तरी चालेल, मी सिंधियांच्या सोबत राहणार आहे. तर दुसरे बंडखोर आमदार गोविंद सिंह राजपूत म्हणाले, कमलनाथ यांनी आमचे मत कधी १५ मिनिटेही ऐकून घेतलं नाही. मग आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी कोणाशी बोलायचं.
मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारने तत्काळ बहुमत चाचणी घ्यावी, यासंबधी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काँग्रेस सरकराला विधानसभेत बहुमत नसून तत्काळ बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस पक्षामध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे.