नवी दिल्ली - वर्ध्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापकेला पेटवून दिल्याच्या घटनेचे संसदेतही पडसाद उमटले आहेत. वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये हा विषय मांडला. पीडितेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून तीला आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच हा खटला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'हिंगणघाट खटला लवकरात लवकर निकाली काढा आणि पीडितेला आर्थिक मदत द्या'
हा खटला लवकरात लवकर निकाली काढून आरोपीला कडक शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्र सरकारला या प्रकरणी जलद कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी खासदार तडस यांनी लोकसभेत केली आहे.
काय आहे प्रकरण?
वर्ध्यातील हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी(3 फेब्रुवारी) घडला. या घटनेत पीडिता गंभीररीत्या जखमी झाली, तिचा चेहरा पूर्णपणे भाजला असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. '
आरोपी विक्की नगराळे हा तिला वारंवार त्रास द्यायचा. ही बाब पीडितेने ३ महिन्याआधी आई-वडिलांना सांगितली होती. यानंतर, तिच्या वडिलांनी विकीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही आरोपी हा पीडितेला सतत त्रास द्यायचा. यातच सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटता टेंबा फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.
दरम्यान, काहींनी तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवत तिला उपजिल्हा रुग्णालयात नेले. पुढील उपचाराकरता तिला नागपूर येथे हलवण्यात आले. या हल्ल्यामध्ये पीडिता सुमारे ३५ टक्के भाजली आहे. यामध्ये तिचा चेहरा, डोळे आणि मान गंभीररित्या भाजले गेले आहेत. पीडितेची वाचा जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढे कदाचित तिची दृष्टीही जाऊ शकते, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.