उमारिया -मध्य प्रदेशातील उमारिया जिल्ह्यातील ८० वर्षीय आदिवासी महिलेने काढलेल्या चित्रांचे इटलीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या महिलेने स्वतःचे निम्मे आयुष्य ही चित्रे काढण्यात घालवले आहे. जोधाय्या बाई बैगा असे या महिलेचे नाव आहे. ती लोरहा या गावाची रहिवासी आहे. तिच्या चित्रांचे इटलीतील मिलान येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
या महिलेच्या पतीचे ४ दशकांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून मन गुंतविण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून या महिलेने चित्रे काढण्यास सुरुवात केली. 'मी सर्व प्रकारचे प्राणी आणि माझ्या आजूबाजूला जे काही दिसेल, त्याची चित्रे काढते. मी भारतातील विविध भागांना खास तेथील चित्रे काढण्यासाठी भेटी दिल्या आहेत. सध्या मी फक्त चित्रेच काढण्यात वेळ घालवते. इतर कुठेही जात नाही. माझ्या पतीचे ४० वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून मी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. मला स्वतःच्या उपजिविकेसाठी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते,' असे या जोधाय्या बाईंनी म्हटले आहे. 'आता माझी चित्रे आंतरराष्ट्रीय व्यापीठावर पोहोचल्यामुळे खूप आनंद होत आहे,' असेही त्या म्हणाल्या.