रांची- शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असल्याचा दावा करते. मात्र, त्याचा लाभ गरिब शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचला आहे याबाबत शंकाच आहे. झारखंडच्या कन्नौद तालुक्यातील भिलार गावात राहणाऱ्या कारीबाई यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वत:च्या 12 वर्षाच्या मुलीला नांगराला जुंपण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारला अजून किती काम करणे आवश्यक आहे हे स्पष्ट होते.
मुलीला जुंपले नागराला; बैल नसल्याने आईची करुणा अवस्था कारीबाई यांच्या पतीचा (हरिदाल) आणि मुलाचा (संतोष) तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कारीबाई यांच्या खांद्यावर येऊन पडली. घरात सासु, मुलगी कृष्णा (12), सतीश (10) अशी खाणारी एकूण चार तोंडं आहेत. दोन मुलींचे कारीबाईने लग्न लावून दिले आहे.कारीबाईंना 4 एकर असणाऱ्या कोरडवाहू जमीनीवर अवलंबून राहावं लागत आहे. शेतात नांगरणीसाठी बैल नसल्याने कारीबाईंना नाईलाजाने आपल्या मुलीला नांगराला जुंपवावं लागले आहे. मुलगी कृष्णाने शाळा सोडली असून ती आईला शेतात मदत करते. पोटात दोन घास घालायचे असतील तर याशिवाय पर्याय नाही असे कारीबाई यावेळी म्हणाल्या.सोयाबीनच्या पिकाला लागणार खर्च लक्षात घेता कारीबाईंनी शेतात मक्का आणि भुईमुग लावण्याचा निर्णय घेतला. कोणीतीही मदत मिळत नसल्याने कुटुंबातील सर्वांनाच शेतातील कामे करावी लागतात. सरकारने दिलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, कल्याणी पेंशन योजना आणि बीपीएल कार्ड धारकांना असणाऱ्या योजनांचा लाभ मिळाल्याचे कारीबाईंनी सांगितले. मात्र, शेतीसाठी कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.कृषी विभागीय अधिकारी आर. के. वर्मा यांना कारीबाईंच्या परिस्थितीची जाणीव करुन देण्यात आली. याविषयी माझ्याकडे माहिती आलेली नव्हती. मात्र, आता कुटुंबीयाना कृषी विभागाच्या योजना प्राधान्याने पुरवल्या जातील, असे वर्मा म्हणाले.