नवी दिल्ली - 'आई होणे' ही स्त्रीसाठी एक सुंदर अनुभूती असते. लॉकडाऊन दरम्यान 'आई' बनलेल्या या महिलेची कथा इतरांसाठीही हृदयस्पर्शी ठरेल. वायव्य दिल्लीतील वजिरापूर औद्योगिक परिसरातील एका जोडप्याने त्यांच्या नवजात मुलाचे नाव 'दयावीर' असे ठेवले आहे. लॉकडाऊनदरम्यान प्रसूतीवेदना सुरू झाल्या असताना एका पोलीस कॉन्स्टेबलने या जोडप्याला रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास मदत केली. याच पोलिसाच्या नावावरून नवजात बाळाच्या आईने त्याचे नाव 'दयावीर' ठेवले आहे.
लॉकडाऊनदरम्यान प्रसूतीवेदना सुरू झालेल्या अनुपासाठी पोलीस कॉन्स्टेबल दयावीर सिंग (वय 31) देवदूत ठरला. 'अनुपाचे पती विक्रम यांनी तिला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ती मिळू न शकल्याने त्यांनी अशोक विहार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथील ठाणेदारांना मदत करण्याची विनंती केली. त्यांच्या मदतीसाठी ठाणेदारांनी आपल्याला पाठवले,' असे दयावीर यांनी सांगितले. दयावीर पोलीस दलात 10 वर्षापासून कार्यरत आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांची अशोक विहार पोलीस ठाण्यात नेमणूक झाली.