कोटा(राजस्थान) - कुन्हाडी स्थानक परिसरात एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी कोरोना झाल्याचे सांगत घराबाहेर काढले. त्यामुळे या महिलेने तिच्या सासरच्या मंडळीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच तिला बदनाम करण्यासाठी सासू-सासरे अफवा पसरवत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
कोरोना झाल्याचे सांगत सासरच्या मंडळींनी महिलेला काढले घराबाहेर - corona update
कोरोना झाल्याचे सांगत एका महिलेला सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या या महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
कोटा येथील कुन्हाडी परिसरात राहणाऱ्या सुनिता मीणा यांनी तक्रारीत नमूद केले आहे, की तिचे सासू-सासरे तिला नेहमी त्रास देतात. तसेच कोरोना झाल्याचे सांगत घराबाहेरही काढले. 'मला काहीच झाले नसून मी ठणठणीत आहे. मात्र, तरीही ते लोक मला घरात येऊ देत नाहीत. मी मैत्रिणीच्या मदतीने भाड्याच्या घरात राहत आहे. माझ्याजवळ जेवणसाठीही पैस नाहीत. मला घरी परत जायचे आहे. मात्र, सासू-सासरे घरात घेत नाहीत.'
पैसे नसल्यामुळे एका ओळखीच्या व्यक्तीजवळ मदत मागितल्यानंतर सासू-सासऱ्यांनी अफवा पसरवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असेही सुनिता मीणा यांनी सांगितले.