नवी दिल्ली : संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय सत्रानंतर 174 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर आता संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अशा प्रकारचा प्रसंग अनेक दशकांमध्ये घडलेला नाही. संसदेच्या दोन सत्रांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त खंड असू नये, या घटनात्मक आदेशाचे पालन करण्यासाठी पावसाळी अधिवेशन घेण्यात येत आहे.
14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत हे सत्र चालेल. या सत्रात एकही खंड नसेल आणि सत्र दोन सत्रामध्ये चालेल. सकाळी लोकसभा आणि दुपारी राज्यसभा असे कामकाज होईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास होणार नसल्याचे राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे म्हटले आहे. तसेच अधिवेशनापूर्वी होणारी सर्वपक्षीय बैठकही रद्द करण्यात आली आहे.
अधिवेशनाला येणाऱ्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. यात कोविड-19 चाचणीच्या 72 तासांत घेतलेल्या अहवालाचाही समावेश आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन दररोज आयोजित केले जाईल. यादरम्यान आठवडी सुट्टीही असणार नाही, अशी माहिती सरकारच्या सर्वोच्च सूत्रांनी माध्यमांना दिली.
दोन्ही सदनांची कार्यवाही दररोज होईल. पहिल्या दिवशी (14 सप्टेंबर) लोकसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत राज्यसभेची कार्यवाही होईल. 14 सप्टेंबरनंतर राज्यसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत होईल. तर, लोकसभा दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत होणार आहे. संसदेची दोन्ही सभागृहे दररोज चार तास चालतील. यादरम्यान सर्व प्रकारचे सावधगिरीचे उपाय अवलंबण्यात येतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वांना सॅनिटायजर्स दिले जाणार आहेत.
दरम्यान, राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूकही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणे अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. जनता दला (यू)चे खासदार हरिवंश आज राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी पुन्हा निवडून येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.