नवी दिल्ली- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी देशात नव्या 92 हजार 071 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 48,46,427 एवढा झाला आहे. दिवसभरात 1136 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 79 हजार 722 इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत 37,80,107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या रोगाचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो. कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे. कोरोनातून बरे होण्याचा देशातील दर 78 टक्के आहे. देशातील कोरोना मृत्यूदर कमी होऊन 1.64 टक्के झाला. सध्या देशातील विविध रुग्णालयांमध्ये 9,86,598 इतके रुग्ण उपचार घेत असून 37,80,107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
दिल्ली -
सोमवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अनिवार्य चाचणीत कोरोना विषाणूची लागण झालेल्या 17 सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि प्रवेश साहिबसिंग वर्मा यांचा समावेश आहे. लोकसभेत भाजपचे सर्वाधिक 12 खासदार कोरोना संक्रमित आहेत, तर वायएसआर कॉंग्रेसचे दोन खासदार आणि द्रमुक, शिवसेना आणि आरएलपी या पक्षांचा प्रत्येकी एक खासदार संक्रमित आहे.
याशिवाय प्रतापराव जाधव, जनार्दनसिंग, सुखबीरसिंग, हनुमान बेनीवाल, सुकांत मजूमदार, गोडेती माधवी, विद्युत बारण, प्रदन बरुआ, एन.के. रेडप्पा, सेल्वम जी, प्रतापराव पाटील, राम शंकर कथेरिया, सत्यपाल सिंग आणि रोडमल नागर या खासदारांचाही बाधितांमध्ये समावेश आहे.
राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जगातील सर्वात कमी आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येची काळजी करण्याची गरज नसून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची काळजी करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्लीत सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
केरळ -
सोमवारी केरळ राज्यात 2,540 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1,10,818 एवढी झाली आहे. 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत एकूण 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.