नवी दिल्ली -जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात व्हर्च्युअल बैठक झाली. दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ‘या बैठकीमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत झाल्याचे ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त अनुमुला शर्मा यांनी शुक्रवारी म्हटले’.
भारत ऑस्ट्रेलिया अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचकारी काळात एकमेकांच्या जवळ आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि स्कॉट मॉरिसन यांच्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध आणखी सुधारले. दोन्ही देशांतील व्यापारामध्ये कोरोनाचा अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे शर्मा म्हणाल्या.
‘व्यापारी संबंधामुळे दोन्ही देशातील विश्वास आणखी वाढेल. भारतातील व्यापाराच्या संधीचा ऑस्ट्रेलिया गंभीरपणे विचार करेल. दोन्ही देशांच्या संबंधांचे अनेक पैलू आहेत. राजनैतिक संबध यात सर्वात वरच्या स्थानी आहेत. मात्र, इतर स्तरावरही दोन्ही देशांचे संबध मजबूत करण्याची गरज शर्मा यांनी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियात राहत असलेले भारतीय नागरिक दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यातील महत्त्वाचा घटक आहे', असे शर्मा म्हणाल्या. शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलिया-चीन संबंधात दुरावा आल्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया संबंध सुधारत आहेत. पॅसिफिक क्षेत्रात दोन्ही देशांच्या मैत्रीला भू-राजकीय आणि रणनितिकदृष्टीने महत्त्व आले आहे. कोरोना आणि भारत -चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडात वेगाने बदल घडत आहेत. चीनच्या आक्रमक धोरणाला विरोध करण्यासाठी आशियायी राष्टांचे एकमत होत आहे.
कोरोना विषाणूचा उगम कसा झाला. याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी ऑस्टॅलियाने केली होती. त्यामुळे चीनचा पारा चढला होता. या कृतीला प्रत्युत्तर म्हणून चीनने ऑस्ट्रेलियाचे बीफ, बार्ली आणि इतर आयात करण्यात येणाऱ्या मालावर निर्बंध लावले. तेव्हापासून दोन्ही देशांतील संबध तणावाचे झाले आहेत. नुकतेच ऑस्ट्रलियाने संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी मोठ्या रकमेची तरतुद केली असून 10 वर्षांचे नियोजन केले आहे. तर काल (गुरुवार) हाँगकाँगबरोबरचा प्रत्यार्पण कायदा रद्द करुन आणि हाँगकाँगवासियांना व्हिसा देण्याची घोषणा करून ऑस्टेलियाने चीनला डिचवले.