नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय पक्षनेतृत्वात मोठा बदल केला आहे. राम माधव, अनिल जैन, सरोज पांडे आणि पी. मुरलीधर राव यांसारख्या नेत्यांनी नावे नव्या पक्ष नेतृत्त्वाच्या यादीतून गायब आहेत. त्यामुळे आता कॅबिनेटमध्येही बदल करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या नेत्यांना आता कॅबिनेटमध्ये जागा मिळते की नाही, ते पाहणे महत्वाचे ठरेल.
उमा भारती, ओम माथुर, प्रभात झा, विनय सहस्त्रबुद्धे, शाम जाजू आणि अविनाश राय खन्ना यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची नावेही नव्या यादीतून गायब आहेत. सुत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, येत्या काही दिवसांत किंवा बिहार विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्वातून वगळण्यात आलेल्या या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
हेही वाचा -बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून केंद्रीय पक्ष नेतृत्त्वात मोठा बदल
पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, केरळ आणि तेलंगणासारख्या महत्त्वाच्या राज्यातील नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. कारण, भविष्यात या राज्यात भाजपला पाया मजबूत करायचा आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. यासोबतच पंतप्रधान मोदी अनेक केंद्रीय खात्यात बदल करण्याची शक्यता आहे. सध्या अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाते आणि विभाग सोपविण्यात आले आहेत. जर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला तर राष्ट्रीय नेतृत्त्वातून वगळण्यात आलेल्या नव्या नेत्याचा समावेश होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
भाजपचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक म्हणून संजय मयुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शाहनवाझ हुसेन आणि राजीव प्रताप रुडी यांची नियुक्ती पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी केली आहे. तर राधामोहन सिंह यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे.