नवी दिल्ली -कोरोना संकटाचे अव्यवस्थापन हे मोदी सरकारचे मोठे अपयश असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी कोरोनावरून भाजप सरकारला लक्ष्य केले.
कोरोनाचा फैलाव भारतात फेब्रुवारी महिन्यात झाला. पहिल्या लॉकडाऊनला काँग्रेसने भाजपला संपूर्ण सहयोग दिला. मात्र, लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान सांभाळण्यास सरकार अपयशी असल्याचे काही आठवड्यातच दिसून आले. त्यामुळे 1947-48 नंतर पहिल्यांदा मोठे मानवतावादी संकट अनुभवायला मिळाले, असे सोनिया गांधी कार्यकारी बैठकीच्या सुरुवातीला म्हणाल्या.
लाखो स्थलांतरीत कामगार, दैनंदिन रोजीरोटी कमावणारे आणि स्वयंरोजगार करणारे उद्ध्वस्थ झाले. अंदाजे 1 कोटी 30 लाख नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या. कोट्यवधी लघु आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्यांना कायमचे टाळे लागले. सरकार प्रशासनाचे केंद्रिकरण करत असून राज्य सरकारांना अतिरिक्त आर्थिक मदत करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदी सरकारने सर्व अधिकार स्वत:कडे घेतले. नागरिकांना सर्व काही ठीक होईल याची खात्री देत राहिले मात्र, कोरोनाचा फैलाव काही थांबला नाही. यामुळे आरोग्य क्षेत्रातील कमकुवत बाजू उघडी पडली. केंद्र सरकारने राज्य सरकारांना मदत मंजूर केली. मात्र, अतिरिक्तत अर्थसहाय्य केले नाही, असे गांधी म्हणाल्या.
नागरिकांची सुरक्षा सरकारने नागरिकांकडेच सोपवली आहे. त्यामुळे मोदी सरकारने केलेल्या कोरोनाच्या अव्यवस्थापनाची नोंद कायमची राहील. आता परिस्थिती गंभीर बनली असून सरकार चांगला सल्ला ऐकण्यासही तयार नसल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.