मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठमधील व्हॅलेंटीस कर्करोग रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती. ज्यामध्ये, एका समुदायाशी संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्यापूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल घेऊनच रुग्णालयात येण्यासंबंधिचा मजकूर टाकला होता. आता त्यांनी दिलेल्या या वादग्रस्त मजकुराची त्यांनी माफी मागितली आहे.
मेरठमधल्या व्हॅलेंटीस रुग्णालयाने स्थानिक वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती. त्यामध्ये एका समुदायाशी संबंधित नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी येताना त्यांची आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तीची कोरोना चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल घेऊनच यावे, असं नमूद करण्यात आलं होतं.
माहितीप्रमाणे, शासनाच्या दिशानिर्देशानुसार खबरदारी म्हणून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत इतर सर्वांनीच कोरोनाची चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले होते, जेणेकरून संसर्गाचे प्रमाण टाळता येईल. त्यात कोणत्याही धर्माचा काहीही संबंध नसून हा नियम सर्वांसाठी सारखाच आहे.
मात्र, याबाबत एका संबंधित समुदायाला उद्देशून ही जाहिरात टाकल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या रुग्णालयाने दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रसिद्ध केला. ‘आमच्या जाहिरातीतून चुकून जर काही आक्षेपार्ह संदेश दिला गेला असेल, त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता’, असं या माफीनाम्यामध्ये म्हटलं असून याबाबत. व्हॅलेंटीस कर्करोग रुग्णालयाचे डॉ. अमित जैन यांनी दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरणही दिले आहे.
दरम्यान, रुग्णालयाने जरी माफीनामा जाहीर केला असला, तरी स्थानिक पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम आहे. याबाबत मेरठचे एसएसपी अजय कुमार साहनी म्हणाले, 'याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून उपलब्ध पुराव्यांनुसार आम्ही कारवाई करत आहोत.' केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात कोरोनाच्या १ हजार ८४ केसेस आढळून आल्या आहेत. यातील १७ जणांचा बळी गेला असून १०८ जण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.