काँग्रेसचा जाहीरनामा दिखाऊ, यापूर्वीही त्यांनी लोकांची फसवणूकच केली - मायावती
२७ मार्चला भाजपने काँग्रेसची किमान उत्पन्न योजना (NYAY - न्यूनतम आय योजना) ही फसवाफसवी आहे, असे म्हटले होते. मात्र, मायावतींनी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष म्हणजे एका माळेचे मणी असल्याचे म्हटले होते.
मायावती, राहुल गांधी
लखनौ - काँग्रेसचा जाहीरनामा दिखाऊ असून त्यांनी यापूर्वीही लोकांची फसवणूक केल्याचा आरोप बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. यासंदर्भात, काँग्रेसने यापूर्वीही दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, असे ट्विट मायावतींनी केले आहे.
'लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आलेला काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हा केवळ दिखाऊपणा असून तो पूर्वीच्या आश्वासनांसारखाच खोटारडा आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या उलट कामे केल्यामुळे लोकांचा काँग्रेसवर विश्वास उरलेला नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच फरक नाही, त्यांनी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत,' असे, ट्विट मायावतींनी केले आहे.
२७ मार्चला भाजपने काँग्रेसची किमान उत्पन्न योजना (NYAY - न्यूनतम आय योजना) ही फसवाफसवी आहे, असे म्हटले होते. मात्र, मायावतींनी दोन्ही पक्ष म्हणजे एका माळेचे मणी असल्याचे म्हटले होते.
काँग्रेसने मंगळवारी निवडणूक जाहीरनामा सादर केला होता. यात प्रामुख्याने तरुण आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. ५५ पानांच्या या जाहीरनाम्यात काम (रोजगार आणि विकास), धाम (सर्वांसाठी काम करणारी अर्थव्यवस्था), शान (मेहनतीला सन्मान), सुशासन, स्वाभिमान आणि सन्मान यांचा मुख्यत्वे समावेश करण्यात आला होता.