कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आर्थिक मंदीवर निर्गुंतवणूक हा काही उपाय नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.
देशात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीवर निर्गुंतवणूक करणे हा उपाय नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थतज्ज्ञांशी चर्चा करावी. याचबरोबर त्यांनी देशातील राजकीय पक्षांची बैठक बोलवून यावर तोडगा काढावा, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
नुकतचं मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने देशाचे पतमानांकन घटविल्यानंतर दुसरा एक धक्का दिला आहे. मूडीजने देशाच्या सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर हा पूर्वीच्या अंदाजाप्रमाणे ५.८ टक्के न राहता ५.६ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. अपेक्षेहून अधिक काळ मंदी राहिल्याने मूडीने आपल्या जीडीपीच्या अंदाजात बदल केला आहे.
भारताची खूप वेगाने विकासदर गाठण्याची क्षमता आहे. मात्र, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकारचे सर्वप्रकारचे असलेले गैरव्यवस्थापन जबाबदार आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली होती. याचबरोबर सरकारने राजकीय वाद बाजूला ठेवत मानवनिर्मित असलेले संकट दूर करण्यासाठी अर्थव्यवस्था नियंत्रणात ठेवावी असे त्यांनी म्हटले होते.