विशाखापट्टणम - महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, "मी एक व्यावहारिक आदर्शवादी आहे". आयुष्यातील अडचणींकडून कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या हे सांगताना गांधीजी म्हणतात, “माझ्याकडे जगाला सांगण्यासाठी नवीन असे काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या गोष्टी या जगाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहेत.” त्यामुळेच, मानवजातीकरिता त्यांनी काही नवीन तत्त्वज्ञान किंवा नवा संदेश दिला आहे असे ते मानत नव्हते. सत्याच्या शोधामध्ये, त्यांना आलेल्या अनुभवातून तसेच चुकांमधूनदेखील ते बऱ्याच गोष्टी शिकले. सत्य आणि अहिंसा हे नेहमीच त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मुख्य सिद्धांत राहिले आहेत. मात्र, एका जैन द्रष्ट्यासोबत चर्चा करताना गांधीजींनी हे मान्य केले आहे, की ते पूर्णपणे सत्यवादी असल्याची खात्री देऊ शकतात, मात्र अहिंसावादी असल्याची नाही. महात्मा गांधी म्हणतात, "सत्याहून मोठा कोणताच धर्म नाही, आणि अहिंसेहून मोठे कर्तव्य नाही".
त्यांच्या अनुयायांनी आणि समर्थकांनी त्यांच्या विचारांना 'गांधीवाद' म्हणू नये, असे गांधीजींचे मत होते. त्यांना तसे करण्यापासून सावध करताना गांधीजी म्हणतात, गांधीवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. मला माझ्या मागे कोणताही पंथ सोडून जायचे नाही. माझ्या विचारांचा प्रसार करण्याची गरज नाही. याबाबत कोणतेही साहित्य असण्याची आवश्यकता नाही. माझ्या विचारसरणीमध्ये, सत्यामध्ये ज्यांना विश्वास आहे, ते त्यानुसार आपले जीवन जगून त्या विचारांचा प्रसार करू शकतात. योग्य क्रियेचा आपसूकच प्रसार होत जातो. रोनाल्ड डंकन गांधींबद्दल लिहितात, की गांधीजी हे अगदी व्यावहारिक व्यक्ती होते. ते नेहमी एखादी गोष्ट इतरांना सांगण्याआधी स्वतःच्या जीवनात आचरणात आणत.
सत्याग्रह असो किंवा सर्वोदय, सत्य असो किंवा अहिंसा - त्यांनी मांडलेले प्रत्येक विचार हे त्यांच्या मनाच्या प्रयोगशाळेत पारखलेले असत. त्यांच्यासाठी विज्ञानही धर्माइतकेच महत्वाचे होते. या दोन्हींमध्ये कोणताही संघर्ष नव्हता. त्यांच्या अध्यात्मामध्ये विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानाचा समान समावेश होता. सत्याग्रहाने जर मानवी विचारांचे उदात्तीकरण होते, तर सर्वोदय हे सर्व लोकांना- श्रीमंत असो वा गरीब, मालक असो वा कामगार, उच्च असो वा नीच- सर्वांना एकत्र आणते.
सर्व समस्यांचे मूळ असलेल्या मानवी मनाला आवर घालणे गरजेचे आहे. मानवी मन, हे एका चंचल पक्षाप्रमाणे असते. त्याला जेवढे द्याल, तितकेच जास्त ते मागत जाते, आणि तरीही असमाधानी राहते. साधे आणि तरीही अर्थपूर्ण असे जीवन तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मन हे स्थिर असेल. संयमाशिवाय परिपूर्णता मिळू शकत नाही.