जयपूर -महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे काही आमदार जयपूरला पोहोचले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार संजय जगपाते, सत्यजीत पाटील, संग्राम थोपते यांच्यासह इतर काही आमदार आज (शुक्रवार) जयपूरला गेले आहेत. याठिकाणी वेगवेळ्या हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार नेले राजस्थानला.. काँग्रेस नेते अविनाश पांडे यांच्या देखरेखीखाली या आमदारांना ठेवण्यात आले आहे. या आमदारांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर आलेल्या अविनाश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आल्याचा निर्णय हा एका कटाचा भाग असल्याचे सांगत, या निर्णयाचा निषेध केला. गांधी कुटुंबातील लोकांनी देशासाठी आपले प्राण त्यागले आहेत. त्यामुळे त्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. गांधी कुटुंबीयांना काही नुकसान झाल्यास, देशाची जनता सरकारला माफ करणार नाही.
आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल..
महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडींबाबत बोलताना पांडे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. या जनादेशाचा आम्ही आदर राखतो. भाजप आणि शिवसेनेला जनतेने सरकार बनवण्याचा जनादेश दिला आहे, तर त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन केले पाहिजे.
महाराष्ट्रातून नेमके किती काँग्रेस आमदार राजस्थानमध्ये आले आहेत असे विचारले असता, त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. ते म्हणाले मी इथे एका विशेष कार्यक्रमासाठी आलो आहे. जे आमदार राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आले आहेत, त्यांचे मी स्वागत करतो.
भाजप करत आहे आमदारांचा घोडेबाजार..
मागील दोन दिवसांपासून ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्यादरम्यान एक एक करून आमदारांना फोन करत वेगवेगळे आमिष दिले जात आहे, काहींना धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेसव्यतिरिक्त बाकी पक्षातील आमदारांनाही फोन केले जात आहेत. ज्याप्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे, त्या सर्व गोंधळात काँग्रेस आपली जबाबदारी समजतो आहे. वारंवार फोन करून कोणी त्रास देऊ नये, यासाठी हे काँग्रेस आमदार आज येथे आले आहेत.
हेही वाचा : इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकारांचा भाजपने संपर्क केल्याचा दावा?