मुंबई - भारतभरात आज महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी 'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. त्यातील 5 ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्ये आहेत.
धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा -
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
सोमनाथ (गुजरात - वेरावळ) - सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. गुजरातच्या सौराष्ट्रात वेरावळनजीक सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ अग्रस्थानी आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे.
मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य) -रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकरिता (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथे आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. हे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये आहे. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पाच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य) महाकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन) - महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मध्य प्रदेश राज्यात उज्जैन येथे हे ज्योतिर्लिंग आहे. रुद्र सागर तलावच्या बाजूला हे मंदिर आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेले आहे. येथे भस्म आरती होते.
महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन) ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) -ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्याच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास १२ मैल (२० कि.मी.) अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह ॐ च्या आकारामध्ये बनले आहे. येथे ॐकारेश्वर आणि अमरेश्वर ही दोन मंदिरे आहेत.ओंकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ॐ सारखा आहे. नर्मदा भारतातली पवित्र समजली जाणारी नदी आहे. ओंकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्य प्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.
ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर) परळी वैजनाथ (महाराष्ट्र) - परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.
वैजनाथ (महाराष्ट्र - परळी) भीमाशंकर (महाराष्ट्र) -भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे.
भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर) रामेश्वर (तामिळनाडू) - रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते.
रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर) औंढानागनाथ (महाराष्ट्र) - नागनाथ मंदिर सुमारे 7500 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. मंदिराच्या पूर्वेला हरिहर नावाचा तलाव आहे. हा तलावही पुरातन आहे. मंदिराचा वरचा पांढरा भाग हा इंदोरची महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 17 व्या शतकात जीर्णोद्धार केलेला आहे. तर खालचा असलेला काळा पाषाण भाग तो मात्र पूर्णपणे द्वापरयुगातील आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून औंढा नागनाथ ओळखलं जातं. औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ) विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी) - विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्षप्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात. हे मंदिर ऐतिहासिक काळात निर्माण झाले होते, असे मानले जाते. इसवी सन 1776 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी रक्कम दान केली होती.
विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी) त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) -या शिवलिंगामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यातील एक हे शिवालय आहे. नाशिकपासून 28 कि.मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. त्र्यंबकेश्वर हे ब्रम्हगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.
त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर) केदारनाथ (उत्तरांचल) - उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचेदेखील मोठे नुकसान झाले. परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोहोचला नाही.
केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) -घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.
घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)