हैदराबाद -टाळेबंदीमुळे अडकलेल्या आपल्या 19 वर्षीय मुलाला आणण्यासाठी 48 वर्षीय माऊलीने दुचाकीवरुन एकदोन नव्हे तब्बल 1 हजार 400 किलोमिटरचा प्रवास केला. तेलंगणातील निजामाबाद येथील शासकीय शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या रझियाबेगम यांचा मुलगा निजामोद्दीनला आंध्रप्रदेश येथील नेल्लोरच्या रहमतपूरहून सुखरुप घरी आणले.
मुलासाठी 'माऊली'ने केला तब्बल चौदाशे किमीचा दुचाकी प्रवास रझीयाबेगम यांचा मुलगा निजामोद्दीन हा आपल्या काही मित्रांना सोडण्यासाठी 12 मार्च रोजी आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील रहमतपूर येथे गेला होता. तेथे त्याने काही दिवस मुक्काम केला. तो आपल्या घरी परत निघणार त्यावेळी देशात सर्वत्र संचारबंदी सुरु झाली. काही दिवस त्याने संचारबंदीतच काढले. पण, त्याला सतत घरची आठवण येऊ लागली. तसेच अशा संकटावेळी मुलाचे काय हाल होत असतील त्याच्या खाण्यापिण्याचे काय, अशी चिंता रझीयाबेगम यांना सतावत होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला कशाही परिस्थितीत घरी आणयचा निर्णय घेतला.
रझीयबेगम यांच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीच निधन झाले. त्या आपल्या दोन मुलांसह निजामाबाद जिल्ह्यातील बोधान गावात राहतात. मोठ्या मुलाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण झाले असून लहान मुलगा निजामोद्दीनला डॉक्टर व्हायचे आहे. हाच निजामोद्दीन रहमतपूरमध्ये अडकला होता. सुरुवातीला त्यांचा मोठा मुलगा भावाला आणण्यासाठी जाणार होता. पण, प्रवासादरम्यान पोलिसांची कारवाई होण्याची भीती होती. अखेर रझीयाबेगम यांनी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला. मग, सर्व शासकीय परवानग्या मिळवणे, प्रवास कसा करायचा, प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याची सोय, असा सर्व खटाटोप केल्यानंतर त्या सोमवारी (दि.6 एप्रिल) सकाळी आपल्या दुचाकीवरुन नेल्लोरला निघाल्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारी त्या पोहोचल्या.
त्या बुधवारी (दि.8 एप्रिल) आपल्या घरी पोहोचल्या. त्या म्हणाल्या, दुचाकीवरुन जाताना मला रात्रीच्या प्रवासाची भीती वाटत होती. पोलिसांनीही वाटेत चांगले सहकार्य केले. प्रवासादरम्याने जेवणासाठी भाजी-भाकरी घेतली होती. पाणी संपल्यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन पाणी पित होते.
हेही वाचा -दोन वर्षांपासून 'ती' राहत आहे विद्युत सब स्टेशनच्या स्क्रबरमध्ये!