तिरुवनंतपूरम - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. केरळ सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी टीकाराम मीना या लॉकडाउन कालावधीचा उपयोग करून घेत आहेत. या काळात आपण पुस्तकांचे वाचण, स्वयंपाक आणि घराची साफसफाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न कसे शिजवायचे किंवा घरातील कामे कशी करावीत, हे जर एका आयएएस अधिकाऱ्याला माहिती नसेल, तर हे लज्जास्पद आहे. लॉकडाऊन कालावधीचा वापर आत्मचिंतन आणि ध्यान करण्यासाठी आपण करु शकतो. या काळात मी माझी आवडती पुस्तके वाचत आहे, असे टीकाराम मीना म्हणाले.
सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट आले असून नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. त्यामुळे नागरिक घरात बसूनही या लॉकडाऊनचा फायदा घेऊ शकतात. यामध्ये पुस्तके वाचणे, संगीत ऐकणे, वृत्तपत्रांतील जुने वाचनीय लेख वाचणे, तसेच अनेक क्षेत्रातील संशोधनाबद्दल वाचन करू शकतो.
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 20.57 टक्के झाला आहे. मागील 28 दिवसांत 15 जिल्ह्यात एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. तर 80 जिल्ह्यामध्ये मागील 14 दिवसांत एकही नवी केस समोर आली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.