देहरादून- महाराष्ट्रातून यमनोत्री दर्शनासाठी गेलेल्या 6 भाविकांना स्थानिक तरुण आणि पोलिसांनी मोठी मदत केली आहे. यमनोत्री दर्शनासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या 6 भाविकांचे पैसे प्रवासादरम्यान हरवले होते. अशावेळी महाराष्ट्रात परत कसे जावे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यांनी स्थानिकांना मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. यावेळी स्थानिक तरुण दीपक बंसल, आशीष कनौजिया आणि रोहित कुमार बंटी यांनी या भाविकांवर विश्वास दाखवला.
मसुरीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या 6 भाविकांना स्थानिकांची मदत - help
यमनोत्री दर्शनासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या 6 भाविकांचे पैसे प्रवासादरम्यान हरवले होते. यावेळी स्थानिक पोलीस अधिकारी भावना कैंथोला यांनी भाविकांना महाराष्ट्रात परत येण्यासाठी मदत केली.
या तरुणांनी मसुरी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती दिली. मसुरी पोलीस स्टेशनच्या कोतवाल भावना कैंथोला यांनी या भाविकांची अडचण समजून घेतली. भाविक खोटं बोलत नसल्याची शहानिशा करुन भावना यांनी मोठा उदारपणा दाखवला. 'अतिथी देवो भव'चा वारसा जपत त्यांनी सर्व भाविकांना महाराष्ट्रात पोहोचवण्याची तात्काळ व्यवस्था केली. सर्व भाविकांच्या रेल्वेचे तिकीट स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने काढून दिले. तसेच भाविकांच्या रात्रीच्या खाण्याचा आणि झोपण्याची व्यवस्थाही करुन दिली. भावना यांनी मानवतेचे दर्शन घडवत भाविकांची पूर्ण मदत केली.
भाविकांनी स्थानिक तरुण आणि कोतवाल भावना यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी केलेली मदत आम्ही महाराष्ट्रात गेल्यानंतरही विसरणार नाही, असं त्यांनी सांगितले.