नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. देशातील खेडागावातही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मात्र, उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील माणा गावात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत असून तिथे अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.
गेल्या मे महिन्यापासून माणा गावात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत आहे. तसेच बाहेरच्या व्यक्तींना या गावात प्रवेश देण्यात येत नसून गावातील लोकांनाही बाहेर जाण्यास परवानगी देण्यात येत नाही. गावातील 150 कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी होत आहे. हे गावा बद्रिनाथ धामपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. येथे भोटिया जमातीचे लोक राहतात.
मला हे सांगताना फार आनंद होत आहे की, ग्रामस्थ कोरोनापासून सुरक्षित आहेत. आमच्या गावातून एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. खरं तर, गावकरी पुढाकार घेत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहेत. आपल्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या भाज्यांची शेती करीत आहोत," असे गाव प्रमुख पीतांबर मोल्फा यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 89 हजार 706 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 73 हजार 890 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 43 लाख 70 हजार 129 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 97 हजार 394 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 33 लाख 98 हजार 845 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.