नवी दिल्ली - काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी भयंकर दहशतवादी हल्ला झाला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४५ जवानांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. यासाठी स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आणि सुरक्षेतील कमतरता कारणीभूत असल्याचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे माजी महासंचालक जनरल डी. सी. डे यांनी म्हटले आहे.
सुरक्षेतील कमतरता पुलवामा हल्ल्याचे कारण - सीआरपीएफचे माजी महासंचालक
पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केली आहे.
ईटीव्ही भारतशी संवाद साधताना डी. सी. डे म्हणाले, की ज्या रस्त्याने राखीव दलाचे जवान जात होते, तो रस्ता एका आठवड्यासाठी बंद होता. जेव्हा हा रस्ता खुला झाला, तेव्हा तेथून जवानांचे ताफे एकाच वेळी गेले. या संधीचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. देशासाठी हे मोठे नुकसान आहे.
डे यांनी सुरक्षेतील कमतरता हे हल्ल्याचे कारण असल्याचे सांगितले आहे. सुरक्षा व्यवस्था कमजोर होती, म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके आणण्यात दहशतवादी यशस्वी झाले. या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा. पण, याच क्षणाला ते व्हायला हवे असे नाही, असेही डे यांनी सांगितले. डी. सी. डे यांनी जम्मू काश्मिरमध्ये ४ वर्षे अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केले आहे.