पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितिश कुमार यांच्यावर निशाणा साधला. येत्या 9 नोव्हेंबरला माझे वडील (लालू प्रसाद यादव) तरुंगातून बाहेर येतील. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा निरोप समारंभ असेल, अशी खोचक टीका तेजस्वी यादव यांनी केली.
चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद यादव हे झारखंडची राजधानी रांची येथे कोठडीत आहेत. चाईबासा कोषागार संबंधित प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला होता. पण दुमका तिजोरी फसवणूक प्रकरणात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असल्याने ते तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत.
लालूंना मिळणार जामीन?
माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच, 9 नोव्हेंबरला लालूजींची सुटका होत आहे. त्यांना जामीन मिळणार आहे. तर त्याच्या दुसर्या दिवशी नितीशजींचा निरोप घेतला जाईल, असे तेजस्वी म्हणाले. बिहार निवडणुकीवेळी कारागृहात असण्याची लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय कारकीर्दीतील ही पहिली वेळ आहे. मात्र, कारागृहातून ते विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहेत.
जामिनावर 6 नोव्हेंबरला सुनावणी!
देवघर कोषागार आणि चाईबासा प्रकरणात लालू प्रसादांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. दुमका कोषागार प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. दुमका प्रकरणात त्यांना सीबीआय न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा दिली आहे. दुमका प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी लालू प्रसाद यांच्यावतीने मंगळवारी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 6 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
काँग्रेस, माकपा, सीपीएम हे राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वात महाआघाडीत आहेत. 243 विधानसभा जागा असणार्या बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल. निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होतील.