नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव, आणि सोमवारी रात्री दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. शुक्रवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ती व्हर्चुअली बोलावण्यात आली आहे.
लडाख प्रांतातील गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाली होती. यावेळी कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसला, तरीही झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तसेच चीनच्या सैन्यातील ४२ सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मृतांची संख्या देखील मोठी आहे. यानंतर सीमेवरील तणाव वाढला आहे. गेल्या पाच दशकांमध्ये अशी घटना पहिल्यांदाच झाली आहे.
कालपासूनच याबाबत मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील याप्रकरणी पंतप्रधानांची भेट घेतली. तसेच लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि सीडीएस बिपीन रावत यांच्यासोबत देखील काही बैठका पार पडल्या.