जयपूर/शिमला -देशभर संचारबंदी लागू केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे आतोनात हाल होताना दिसत आहे. राजस्थानमधील पोखरण येथे काम करणाऱ्या 33 कामगारांना फक्त 20 किलो गव्हाचे पीठ आणि अर्धा लिटर तेल देण्यात आले. या महिलांनी फक्त मुलांची भूक भागवून केवळ पाण्यावर दिवस काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब पोलिसांना कळल्यानंतर राजस्थान पोलिसांनी या कामगारांना एका शाळेमध्ये निवारा दिला.
तसेच राजस्थानच्या भरतपूर येथेही कामगार अन्नावाचून उपाशी झोपत असल्याचे समोर आले आहे. भरतपूर येथे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेेश आणि बिहारमधील कामगार काम करतात. हे सगळे कामगार घरी जाण्यासाठी आतुरले आहेत. मात्र, संचारबंदीमुळे त्यांना जाऊ दिले जात नाही. तसेच काही कामगारांनी तर हजारो मैल दूर प्रवास करत घर गाठत आहेत.