हेग - भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) ही सुनावणी होणार आहे. यावेळी भारत आणि पाकिस्तान याप्रकरणी आपापले युक्तिवाद करणार आहेत. हेग येथील पीस पॅलेसमध्ये ही सुनावणी होईल.
कुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्कराने हेरगिरीच्या आरोपावरुन पकडून जेरबंद केले आहे. त्यामुळे भारताने याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी आजपासून सुनावणी सुरू होत आहे.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने मार्च २०१६मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तसेच, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच, कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. यानंतर या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती.
पाकिस्तानी लष्कराने कुलभूषण यांना बलुचिस्तान प्रांतात पकडल्याचा दावा पाकने केला होता. तसेच, कुलभूषण इराणमार्गे पाकिस्तानात घुसल्याचा बनाव रचला होता. भक्कम पुरावे असल्याची बतावणी करत पाकिस्तानी मिलिटरी न्यायालयाने कुलभूषण यांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय एकतर्फी फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, पाकिस्तानचे सर्व मुद्दे भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. यामुळेच कुलभूषण यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती आणली होती. तसेच, पाकिस्तानला चांगलेच खडसावले होते.
- तोंडी सुनावणीची पहिली फेरी
- १८ फेब्रुवारी - सकाळी १० ते दुपारी १ (भारताची बाजू)
- १९ फेब्रुवारी - सकाळी १० ते दुपारी १ (पाकिस्तानची बाजू)
- तोंडी सुनावणीची दुसरी फेरी
- २० फेब्रुवारी - दुपारी ३ ते ४ : ३० (भारताची बाजू)
- २१ फेब्रुवारी - दुपारी ४ : ३० ते सायंकाळी ६ (पाकिस्तानची बाजू)