पणजी- गोवा येथील किनारी कृषी संशोधन संस्थेतर्फे २ ते ४ मार्च दरम्यान 'किनारी कृषी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. शेती क्षेत्राशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान, वेगवेगळ्या पिकांच्या सुधारित जाती, पशूपालन, मत्सशेती, कुक्कुटपालन, वराहपालन आदी विषयांवरील माहिती आणि तंत्रज्ञान याचे प्रदर्शन आणि माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेच्या जुना गोवा येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संचालक डॉ. एकनाथ चाकूरकर म्हणाले, की किनारी कृषी मेळावा यामुळे शेतकऱ्यांना कृषीतज्ञांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. यामध्ये लक्षद्वीप येथील १५ शेतकरी सहभागी होणार आहेत. तसेच कोकण कृषी विद्यापीठ, धारवाड कृषी विद्यापीठ, कोलकाता, कोझिकोड येथील विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचे उद्घाटन आयसीएआरचे महासंचालक त्रिलोचन महापात्रा यांच्या हस्ते २ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता होणार आहे.