केसीआर यांची तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी, पंतप्रधान पदासाठी सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न - pm candidate
केसीआर यांची भेट अत्यंत महत्त्वाची होती, असे केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे. 'केसीआर यांनी राष्ट्रीय राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली. सध्याच्या परिस्थिती भाजप, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांना बहुमत मिळणे कठीण असल्याचे त्यांचे मत आहे,' असे ते म्हणाले
नवी दिल्ली - प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त तिसरी संयुक्त आघाडी तयार करण्याची मोहीम तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राबवली आहे. यातून प्रादेशिक पक्षांचे राजकीय हित साधले जाईल आणि काँग्रेस-भाजपला एक पर्याय उपल्बध करता येईल, असा अंदाज बांधला जात आहे. राव यांनी नुकतीच केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांची भेट घेतली. ते कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याही संपर्कात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, केसीआर सध्या विविध प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी सोमवारी केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांची भेट घेतली. त्यांनी यादरम्यान '१९९६ फॉर्म्युला'च्या आधारावर काँग्रेस आणि भाजपाशिवाय तिसरा मोर्चा बांधण्यास सुरुवात केली आहे. केसीआर मागील काही वर्षांपासून तिसऱ्या मोर्चाचा चेहरा बनले आहेत. ते कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याही संपर्कात आहेत. तसेच, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल जस-जसा जवळ येत आहे, तस-तशी या हालचालींमध्ये गती येणार आहे. त्यामुळे दक्षिणेतून पंतप्रधान पदाचा उमेदावार समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, '१९९६ फॉर्म्युला' फारसा यशस्वी झाला नव्हता. अनेक पक्षांच्या मोर्चेबांधणीतून सरकार तयार झाल्याने ते अस्थिर बनले होते. सत्ता सांभाळण्याच्या नादात ३ पंतप्रधान झाले होते आणि सरकारे कोसळली होती.
दरम्यान, केसीआर यांची भेट अत्यंत महत्त्वाची होती, असे केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे. 'केसीआर यांनी राष्ट्रीय राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली. सध्याच्या परिस्थिती भाजप, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांना बहुमत मिळणे कठीण असल्याचे त्यांचे मत आहे. यामुळे राजकीय फायद्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,' असे ते म्हणाले.
केसीआर यांनी द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांचीही भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, केसीआर यांच्या कन्या खासदार के कविता यांनी अद्याप अशी भेट झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच, केसीआर आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पार्टीचे जगनमोहन रेड्डी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.