कोप्पल (कर्नाटक) - कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर फिरताना आढळत आहेत. कर्नाटक पोलिसांनी या लोकांना रोखण्यासाठी एका अनोख्या युक्तीचा वापर केला आहे. यामुळे तरी विनाकारण भटकणाऱ्यांना चांगला धडा मिळेल, अशी आशा आहे.
लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला असा 'धडा' कोप्पल जिल्ह्यातील अशोका सर्कल भागात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी पकडले आणि त्यांना शिक्षा म्हणून गव्हाच्या पिठाची पोती अंगावर कपड्यांप्रमाणे घालायला लावली.
लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला असा 'धडा' जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांना उन्हातान्हातून खाकी वर्दी घालून फिरावे लागते. जाडजूड खाकी कापडामुळे वावरण्यातील सहजपणा कमी होतो. याशिवाय विविध परिस्थितींमध्ये आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे बचावात्मक पोशाखही घालावे लागतात. याचाच अनुभव लोकांना यातून द्यायचा होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि डॉक्टर्स यांना स्वसंरक्षण पोशाख (पीपीई) घालूनच वावरावे लागते. परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही स्वसंरक्षणासाठी असे पोषाख घालावे लागतात. हे सर्वजण कोरोना विषाणूसोबत सुरू असलेल्या लढाईत आघाडीवर आहेत.
'आम्ही 15 मिनिटेही अशा प्रकारचे कपडे घालू शकत नाही. पोलीस आणि डॉक्टर आम्हाला वाचवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि विनाकारण घरातून बाहेर न पडणे आवश्यक आहे. आम्ही यापुढे या बाबींचे पालन करणार आहोत,' असे पोत्याचा पोशाख घालण्याची शिक्षा झालेल्या एकाने सांगितले.