जळगाव - कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने कर्नाटकात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. दोन्ही राज्यांच्या सरकारने एकमेकांशी संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना जलाशयातून विसर्ग नियमित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती येडियुरप्पा यांनी पत्रात केली आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरण १०० टक्के भरले आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण कर्नाटकातून पुढे विसर्ग सोडण्यात येत नाही.त्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन आपल्याकडे सांगली कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. या विषयासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारच्या सतत संपर्कात आहोत, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन
कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मात्र, कर्नाटकातून पुढे विसर्ग सोडला जात नाही. कर्नाटक सरकारने अडीच ते तीन लाख क्यूसेक प्रतिसेकंद या वेगाने पुढे विसर्ग सोडण्याची गरज आहे. कोयनेतून पाणी सोडताना आम्ही तेथील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. कर्नाटकने पुढे विसर्ग सोडला तर दोन्ही राज्यातील पूरस्थिती ओसरेल, असेही महाजन यावेळी म्हणाले.