नवी दिल्ली - लोकसभेत वादळी चर्चेनंतर मंजूर झालेले नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक आज (बुधवारी) राज्यासभेत चर्चेला घेण्यात आले आहे. यावेळी बोलताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या विधेयकावर आणि भाजपवर चांगलीच टीका केली. भाजप देशाचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे. कोणताही धर्म नागरिकत्त्व मिळण्याचा आधार नसावा. दुसऱ्या देशातील नागरिकांवर अत्याचार झालाय, हे सरकारला कसे समजणार. भाजप संविधानाची तोडमोड करत आहे. या विधेयकाद्वारे नाव न घेता एखाद्या धर्माला लक्ष्य केले जात आहे. भाजपला मी घाबरत नाही, मुस्लीम घाबरत नाहीत. कोणताही नागरिक घाबरत नाही. आम्ही फक्त संविधानाला घाबरतो, असे सिब्बल आपल्या भाषणात म्हणाले.
दोन देशांची संकल्पना सावरकर आणि जिन्नांची..
मी या विधेयकाला विरोध करत आहे असे म्हणत सिब्बल यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, की आपल्याला या विधेयकाची गरज का आहे, हे सांगताना माननीय गृहमंत्र्यांनी संसदेच्या दुसऱ्या सभागृहमध्ये जे कारण सांगितले, त्याने मी उद्विग्न झालो होतो. ते म्हणाले, की स्वातंत्र्यावेळी काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाची फाळणी केली. जर काँग्रेसने तसे केले नसते, तर आपल्याला आज या विधेयकामध्ये सुधारणा करण्याची गरज पडली नसती. मला समजत नाही, की त्यांनी कोणत्या पुस्तकांमधून इतिहास वाचला आहे. मात्र, मी त्यांना हे सांगू इच्छितो की, दोन देश तयार करण्याची संकल्पना ही काँग्रेसची नव्हती. मात्र, हे विधेयक पारित झाले, तर तुम्ही तुमचीच (भाजपची) संकल्पना सत्यात उतरवाल. स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः असे म्हणाले होते की, भारतात दोन विरोधी राष्ट्रे शेजारी शेजारी राहत आहेत. हे आमचे नाही, तर सावरकरांचे मत होते. सावरकर आणि जिन्ना हे दोन विरोधी विचारांचे नेते होते. मात्र, दोन स्वतंत्र्य राष्ट्रांच्या निर्मितीबाबतच्या विचारावर दोघांचेही एकमत होते, हा विरोधाभास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला होता. दोन राष्ट्रांची संकल्पना ही काँग्रेसची नाही, तर सावरकर आणि जिन्नांची होती. भारतात एक हिंदू आणि एक मुस्लीम राष्ट्र आहे, असे या दोघांचेही ठाम मत होते. त्यामुळे गृहमंत्र्यांचा हा आरोप, की काँग्रेसने फाळणी केली, तो मागे घेण्यात यावा. कारण काँग्रेस हे कायम एकराष्ट्र संकप्लना माननारे राहिले आहे.
हे ऐतिहासिक विधेयक, कारण तुम्ही संविधानच बदलायला निघाला आहात..
नागरिकत्त्व सुधारणा विधेयक ऐतिहासिक आहे, असे गृहमंत्री म्हणत आहेत. हे विधेयक नक्कीच ऐतिहासिक आहे कारण, भाजप संविधानच बदलायला निघाले आहे. गृहमंत्री असेही म्हटले होते, की या विधेयकामुळे करोडो लोक उद्या एक नवी पहाट पाहतील. मात्र, मी त्यांना हे सांगू इच्छितो, की लाखो लोकांची काळरात्र संपणारच नाही. ते असेही म्हणाले होते, की ते 'सबका साथ और सबका विकास' या उक्तीवर विश्वास ठेवतात. मात्र, विकास आणि विश्वासदेखील त्यांनी गमावला आहे, कारण २०१४ नंतर आतापर्यंत सर्वांच्या सोबत ते कधीच उभे राहिले नाहीत. तुम्ही आम्हाला म्हणत आहात की राजकारणाच्या पलीकडे विचार करा, मात्र तुम्ही जे करत आहात ते केवळ राजकारणच आहे. तुम्ही या देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहात.
या विधेयकाबाबत सिब्बल यांनी मांडलेले काही मुद्दे..
- हे विधेयक द्विराष्ट्र संकल्पनेला कायदेशीर करण्यास मदत करेल. याबाबत मी याआधीच सांगितले आहे.
- नागरिकत्व मिळवण्याबाबत धर्म हा मुद्दा विचारात घेतला जाऊ नये. भारताच्या संविधानाने हा विचार आधीच फेटाळला आहे.