पणजी- एका बाजूने पर्यटक कमी होत आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परवानगी शिवाय कळंगुट ग्रामपंचायत टिटोजलेन येथे मातीचा भराव टाकून रस्ता बनवत आहे. यामुळे किनाऱ्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे काम तत्काळ न थांबविल्यास मंगळवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला जाईल, असा इशारा कळंगुट कान्स्टिट्युअन्सी फोरमने दिला आहे.
'कळंगुट ग्रामपंचायतीने समुद्र किनाऱ्यावरील रस्ताकाम तत्काळ थांबवावे' - constituency
कळंगुट ग्रामपंचायत टिटोजलेन येथे मातीचा भराव टाकून रस्ता बनवत आहे. यामुळे किनाऱ्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
फोरमच्यावतीने पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष प्रेमानंद दिवकर म्हणाले, कळंगुट ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचे ना हरकत दाखले घेतलेले नाही. तरीही सुमारे १७० मीटर रस्ता येथील जमीन खोदून करण्यात आला आहे. बेकायदेशीरित्या सुरु असलेले हे बांधकाम तत्काळ थांबवावे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कामाचा स्थानिक लोकांनी विरोध करत पंचायतीचा निषेध केला. तसेच हे काम थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीला ८ दिवसांची मुदत दिली आहे. जर हे काम थांबले नाही तर येत्या मंगळवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीला निवेदन दिले परंतु, त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. उलट पर्यावरण मंत्र्यांनी याची दखल घेत तत्काळ समिती नियुक्त केली आहे, असे सांगून दिवकर म्हणाले, सरकार पर्यटक येत नाही म्हणते. तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे निसर्ग सौंदर्य नष्ट केले जात आहेत. डोंगर तोडले जात आहेत. कधीच भरून न येणारे निसर्गाचे नुकसान फायद्यासाठी केले जात आहे. या पत्रकार परिषदेसाठी उपाध्यक्ष डँनिजल, अँथनी डिसोझा आणि फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.