महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नागपूरचे शरद बोबडे सरन्यायाधीशपदी, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शपथविधी पूर्ण - Justice Sharad Arvind Bobde

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. यासोबतच त्यांनी देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली.

न्या शरद बोबडे

By

Published : Nov 18, 2019, 8:31 AM IST

Updated : Nov 18, 2019, 3:02 PM IST

नवी दिल्ली -सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी आज (सोमवारी) सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. यासोबतच त्यांनी देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत न्या. बोबडे यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेताना न्या. शरद बोबडे

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशातील विविध ऐतिहासिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका वठवली. अयोध्या निकाल प्रक्रियेमध्येही त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सरन्याधीशपदाची त्यांची कारकीर्द ही १७ महिन्यांची राहणार आहे. ते सरन्यायाधीश पदावरून २३ एप्रिल २०२१ ला निवृत्त होतील. रविवारी १७ नोव्हेंबरला विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे सेवानिवृत्त झाले. त्यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी. यासाठी न्याय मंत्रालयाला पत्र लिहून शिफारस केली होती. न्या. बीपी गजेंद्रगडकर, न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदाचा मान तिसऱ्यांदा महाराष्ट्राला मिळणार आहे.

हेही वाचा - मराठमोळे न्यायमूर्ती बोबडे नवे सरन्यायाधीश, नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी

न्या. बोबडे यांचा जन्म नागपूर येथे २४ एप्रिल १९५६ रोजी वकील कुटुंबात झाला. त्यांचे वडील अरविंद बोबडे यांनी महाराष्ट्राचे अ‌ॅडव्होकेट जनरल पद भूषवले आहे. न्या. बोबडे यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९७८ साली ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य बनले आणि १९९८ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली.

हेही वाचा - रंजन गोगोई : शेवटचे दहा दिवस, अन् सहा अतिमहत्त्वाचे निर्णय..

त्यानंतर, मार्च २००० मध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणूनही त्यांची निवड झाली. त्यानंतर, १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.१२ एप्रिल २०१३ ला त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अर्जन कुमार सिकरी यांचाही शपथविधी पार पडला होता. २०१६ साली नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. यासोबतच नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे बोबडे हे नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती झाले.

हेही वाचा - मराठमोळे न्यायमूर्ती बोबडे नवे सरन्यायाधीश, नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी

सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोई नंतर बोबडे हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत. नागपूर व महाराष्ट्रासाठी ही अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व बोबडे कुटुंबीयांचे स्नेही विकास शिरपूरकर सांगतात. सम्यक बुद्धिमत्तेचे व स्थितप्रज्ञ असे बोबडे यांचे व्यक्तिमत्व असल्याचेही शिरपूरकर म्हणाले. न्यायमूर्ती शरद बोबडे हे तल्लख बुद्धिमत्तेचे व बॅलन्स वकील आहेत. तसेच कुठल्याही घटनेने डगमगून न जाणे असा न्या. शरद बोबडे यांचा स्वभाव असल्याचेही शिरपूरकर म्हणाले. भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून बोबडे यांना तब्बल दीड वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. न्या. बोबडे हे सरन्यायाधीश पदावरून सन २०२१ मध्ये निवृत्त होणार आहेत.

Last Updated : Nov 18, 2019, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details