वॉशिंग्टन डी. सी- डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत बाजी मारली आहे. ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदी विराजमान होतील. ३ तारखेला मतदान झाल्यानंतर आज शनिवारपर्यंत मजमोजणी सुरू होती. अॅरिझोना राज्यात बायडेन यांनी विजय मिळविल्यानंतर २७० पेक्षा जास्त मते त्यांना मिळाली आहेत. तसेच पेन्सल्वेनिया राज्यातही ते आघाडीवर असून स्थानिक माध्यमांनी त्यांना तेथे विजयी घोषित केले आहे.
४६ वे राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान
जो बायडेन यांनी दोनवेळा बराक ओबामा यांच्या काळात उप-राष्ट्राध्यक्षपद सांभाळले आहे. तसेच ते वरिष्ठ सिनेटर आहेत. काही राज्यात मतमोजणी अद्यापही सुरू असून अमेरिकेतील माध्यमांनी बायडेन यांना विजयी घोषित केले आहे. विजयी होण्यासाठी त्यांना २७० मतांची गरज होती. त्यांना सुमारे २८४ मते मिळाली आहेत. जॉर्जिया आणि नवाडा राज्यातही ते आघाडीवर आहेत.