पटना- गेल्या कित्येक दिवसांपासून खदखदत असलेला जनता दल (यू) आणि भाजपतील संघर्ष आज बाहेर आला आहे. अध्यक्ष नितिश कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत आज जद(यू)ने भाजपप्रणीत एनडीए आघाडीतून बिहार वगळता इतर राज्यात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नितिशकुमार रालोआ आघाडीत नाखूश असल्याचे वृत्त होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सरकराकडून दिले गेलेले एक मंत्रीपदही नाकारले आहे. अशातच आता नितिश कुमारांनी बिहार वगळता इतर राज्यात भाजपसोबत न जण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली आणि झारखंड राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे आज जनता दल (यू) तर्फे जाहीर करण्यात आले आहे.
नितिश कुमार यांचे बिहारमधील सरकार भाजपच्या पाठिंब्याने सत्तेत आहे. काही दिवासांपूर्वीच नितीश कुमारांनी मंत्रिमंडळ विस्तार केला होता. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला काही मंत्रीपदे मिळण्याची शक्यता होती. मात्र, नितिश यांनी भाजपला डावलून एकही मंत्रिपद दिले नाही. मोदींच्या मंत्रीमंडळात जदयूला एकच मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा राग नितिश यांचा राग या मंत्रीमंडळ विस्तारात दिसून आला होता. भाजपला राज्यात एकही मंत्रीपद न देता त्यांनी हिशेब चुकता केला होता.
आता नितीशकुमारांनी बिहार वगळता इतर राज्यात भाजपसोबत युती न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नितिश यांच्या भूमिकेवर भाजप काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नितिश यांचा पाठिंबा भाजपने काढून घेतल्यास नितिश यांचे सरकार कोसळू शकते. नितिश यांना लालूप्रसाद यादव यांच्या राजदनेही पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात बिहार राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथी घडून येण्याची शक्यता आहे.