श्रीनगर -काश्मीरमध्ये एका बसमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आली. पोलिसांनी तब्बल १५ किलोंच्या स्फोटकांसह २ व्यक्तींना अटक केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जम्मू बसस्थानकाजवळ पोलिसांनी ही बस अडवली. यामध्ये एका बॅगमध्ये ही स्फोटके आढळून आली.
पोलिसांनी या स्फोटकांसह २ संशयित व्यक्तींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. हे दोघे काश्मीरहून जम्मूकडे निघाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही स्फोटके वेळीच जप्त करण्यात आल्याने मोठा घातपात टळला आहे. जम्मू बसस्थानक या अगोदरही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते.
हेही वाचा - इम्रान खान दहशतवाद्यांचे 'रोल मॉडेल,' गौतम गंभीर यांचा हल्लाबोल
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी आर्टिकल ३७० आणि ३५ ए रद्द करण्यात आल्यापासून पाकिस्तान भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या देत आहे. तसेच, पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांची निर्यात करत आहे, हे सत्य जगजाहीर आहे. सध्या पाकिस्तानमधून भारतात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान जगभरात जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे सांगत गळा काढत आहे. तसेच, पाक सैन्यानेही अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मागील २४ तासांमध्ये पाकिस्तानने २ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात एक जवान जखमी झाला आहे.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये ओलीस नागरिकाला सोडवण्यात यश, एका जवानाला वीरमरण
शनिवारी रामबन जिल्ह्यात दहशतवादी आणि लष्करादरम्यान झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. तसेच, या मोहिमेत एका जवानाला वीरमरण आले आणि २ पोलीसही जखमी झाले होते. यानंतर तीनच दिवसांत जम्मू बसस्थानकाजवळ बसमधून १५ किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यामुळे घातपात टळला आहे.