नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी आज (मंगळवार) बिहारमधील जहानाबाद येथून शरजील इमामला अटक केली. या अटकेविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी पोलीस आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत इमामच्या सुटकेची मागणी केली.
विद्यापीठ आवारातील मध्यवर्ती उपहारगृहाजवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच विद्यापीठात मोर्चा काढला. शरजील इमाम निर्दोष असून पोलीस विनाकारण त्याला अडकवत आहेत, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शरजील इमाम हा जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे.
इमामने आत्मसमर्पन केले?
इमाम शरजीलला पोलिसांना अटक केली नसून त्याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले, असे आंदोलनात सहभागी असलेले विद्यार्थी म्हणाले. आपण सर्वांनी शरजीलच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र व्हावे लागेल, असे विद्यार्थी म्हणाले. जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कालही शरजीलच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता.