अमृतसर - ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची साक्ष असणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. भारताच्या इतिहासातील ही दुःखद आणि संतापजनक घटना आहे. जनरल डायरने निरपराध जनतेवर बेछूट गोळीबाराचे आदेश दिले होते. या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनी अमृतसर येथील जालियनवाला बागमधील स्मारकाला भेट देत मृतांना श्रद्धांजली वाहिली.
जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ एप्रिल १९१९ला ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायरने ब्रिटिशांविरोधात शांततापूर्ण मार्गाने सभा घेणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार करत त्यांची हत्या घडवून आणली होती. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅफ्टन अमरिंदर सिंग आदी उपस्थित राहत श्रद्धांजली वाहिली.
आज या दुःखद घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त ट्विटरवर #JallianwalaBaghMassacre आणि #JallianwalaBaghCentenary हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत. #JallianwalaBaghCentenary या हॅशटॅगसह ३६.६ हजारांहून अधिक ट्विटस करण्यात आली आहेत. तर, #JallianwalaBaghMassacre या हॅशटॅगसह केलेल्या ट्विटसची संख्या ९ हजारांहून अधिक गेली आहे.