नवी दिल्ली- आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यनुसार कोरोना हा बाधित रुग्णाच्या शिंकण्यामुळे, खोकल्यामुळे किंवा बोलताना तोंडातून उडालेल्या थुंकीमुळे पसरु शकतो. अशात प्राण्यांबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत खूप कमी प्राण्यांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. त्यातही कुत्र्यांच्या तुलनेत मांजरांमध्ये हा विषाणू अधिक प्रमाणात आढळला आहे.
आतापर्यंत अनेक माध्यमांनी याबद्दलचे वृत्त दिेले आहे. मात्र, तज्ञांनी अद्यापही हे घोषित केले नाही, की कोरोना पाळीव प्राण्यांपासून माणसांना होऊ शकतो.
प्राण्यांना कोरोनाची लागण -
बेल्जियममध्ये एका मांजरीला तिच्या कोरोनाबाधित मालकामुळे कोरोना झाल्याची बाब उघडकीस आली आहे. कोरोनाची तपासणी करण्याआधी मांजरीमध्ये श्वास घेण्यास त्रास तसेच उलट्यांसारखी लक्षणे आढळली होती.
कुत्र्यालाही कोरोना विषाणूची लागण -
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्यालाही या विषाणूची लागण होऊ शकते. हाँगकाँगमध्ये एका जर्मन शेपर्ड आणि एका मिक्स ब्रीड कुत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. हाँगकाँगच्या अॅग्रीकल्चर, फिशरीज आणि कंजरवेशन डिपार्टमेंटने स्वतःच या गोष्टीची माहिती दिली होती.
पाळीव प्राण्यांनाही होऊ शकते कोरोनाची लागण? यावर प्रतिक्रिया देताना जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की या मांजरीला आणि कुत्र्यांना कोरोनाची लागण झाली असली, तरीही प्राण्यांपासून हा रोग माणसांना होऊ शकतो, असे अद्याप स्पष्ट झाले नाही.