नवी दिल्ली -गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी जात असल्याने सीमेवरील परिस्थिती निवळताना दिसून येत आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने चीनबरोबरच्या चर्चेवरून पुन्हा पंतप्रधान मोदींसमोर प्रश्न उपस्थित केल आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवर जो बफर झोन ठेवण्यात आला आहे, तो भारताच्या भूप्रदेशात आहे का? तसेच गलवान व्हॅलीवरील भारताचा दावा सौम्य करण्यात आला आहे का? असा सवाल काँग्रेसने मोदींना विचारला आहे.
'मोदी सरकार गलवान व्हॅलीवरील दावा कमकुवत करत आहे का?'
भारत चीन सीमेवर जो बफर झोन आहे, तो भारताच्या भूभागात आहे का? तसेच गलवान व्हॅलीवरील भारताचा दावा कमजोर करण्यात आला आहे का? असा सवाल काँग्रेसने मोदींना विचारला आहे.
भारतीय सैन्य माघारी येत असतानाचा काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी चार प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदी तुम्ही बफर झोन भारताच्या भूमीत तयार करत आहात का? आपल्या सैन्याला माघे येण्यास भाग पाडत आहात का? गस्त चौकी 14 (पॅट्रोलिंग पॉईंट 14) हा भारताचा भाग आहे, यावर तडजोड करण्यात आली का? गलवान व्हॅलीवरील भारताचा दावा सौम्य करण्यात आला आहे का? असे सवाल त्यांनी भाजपला विचारले आहेत. सुरजेवाल यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत हे प्रश्न विचारले.
गलवान खोऱ्यात 15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैन्यात धुमश्चक्री झाली. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले तर काहीजण जखमी झाले. चीनने गलवान व्हॅलीवर दावा केल्यामुळे भारत आणि चीनच्या संबधामध्ये दुरावा आला आहे. मात्र, त्यानंतर लष्करी, राजनैतिक आणि विशेष प्रतिनिधी स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे आता सीमेवरील वाद निवळण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूंनी सैन्य आणि लष्करी सामुग्री माघारी आण्याण्यात येत आहे.