महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात IPS अधिकाऱ्याचा राजीनामा

मी सर्व न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की लोकशाही मार्गाने या विधेयकाचा विरोध करा. हे विधेयक संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारे आहे', अशा शब्दांत टि्वट करत रहमान यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

Abdur Rehman, IPS
IPS अधिकारी अब्दुर रहमान

By

Published : Dec 12, 2019, 9:54 AM IST

मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ IPS अधिकारी अब्दुर रहमान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. रहमान यांनी स्वत: टि्वट करत ही माहिती दिली. १९९७च्या बॅचचे अधिकारी असलेले रहमान सध्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. हे विधेयक भारताच्या धार्मिक एकतेविरोधात असल्याची टीका रहमान यांनी केली आहे.


'नागरिकत्व दुरुस्ती विधेयक भारताच्या धार्मिक एकतेच्या विरोधात आहे. मी सर्व न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की लोकशाही मार्गाने या विधेयकाचा विरोध करा. हे विधेयक संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारे आहे', अशा शब्दांत टि्वट करत रहमान यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. टि्वटमध्ये रहमान यांनी राजीनामा दिल्याचे पत्रही पोस्ट केले आहे.


संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, संपूर्ण भारतात विशेषत: ईशान्य भारत आणि आसाममध्ये या विधेयकाविरोधात जोरदार पडसाद उमटले आहेत. विद्यार्थी, लोक रस्त्यावर उतरून विधेयकाचा निषेध नोंदवत आहेत.


३ महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज -

अब्दुर रहमान यांनी ३ महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे त्यांचा अर्ज मंजूर होऊ शकला नाही. यावेळी मात्र रहमान यांनी आपण नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.


IAS अधिकारी कन्नन गोपीनाथन आणि राजीनामा -

केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर IAS अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काश्मिरींना अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप गोपीनाथन यांनी केला होता. देशात काही चुकीचे होत असल्यास जनतेला त्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे, असेही गोपीनाथन यांनी स्पष्ट केले होते.


कोण आहेत कन्नन गोपीनाथन -

कन्नन यांनी 'बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून बी.टेकची पदवी घेतली आहे. २०१२ मध्ये सिव्हिल सर्व्हिस परिक्षेत ५९ वा क्रमांक पटकावला होता. कन्नन यांनी केरळमध्ये अनेक महत्वांच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे सचिवपददेखील भूषवले आहे. तसेच जिल्हाधिकारीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details