नवी दिल्ली - देशाचा अर्थमंत्री हे उच्च आणि प्रभावी पद सांभाळणाऱ्या व्यक्तीने त्या पदाचा आपल्या स्वार्थासाठी गैरवापर केला; हा आरोप अमान्य असल्याचे चिदंबरम यांच्या वकिलांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
सध्या चालू असलेले प्रकरण हा लोकांचा विश्वासघात नाही. या प्रकरणात सार्वजनिक तिजोरीचे कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणात कोणत्याही सार्वजनिक निधीचा सहभाग नव्हता. तसेच हे बँक फसवणूक किंवा देशाबाहेर पैसे पाठवण्याचे देखील प्रकरण नाही. असा युक्तीवाद देखील पी. चिदंबरम यांच्या वकीलाने आज दिल्ली उच्च न्यायालयात मांडला. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी पी. चिदंबरम यांची भेट घेतली. दिल्लीच्या तिहार तुरुंगात त्यांनी भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम यांची भेट घेतली. यावेळी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरमदेखील उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीबद्दल कार्ती यांनी मानले आभार
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी दिलेल्या भेट देऊन, या काळात आपण पाठीशी असल्याचे सांगितल्यामुळे आपल्याला आधार मिळाला असल्याचे कार्ती यांनी सांगितले.