जगभरात 10 ते 24 वयोगटातल्या तरुणांची संख्या 1.8 अब्ज इतकी आहे. जगात आतपर्यंतच्या लोकसंख्येच्या प्रमाणवारीत तरुणांची एवढी संख्या असण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज शाळेत जाणाऱ्या 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना नीट लिहता-वाचताही येत नाही. हीच मुलं येणाऱ्या काळात तरुणाईचा हिस्सा बनतील. त्यामुळे त्या तरुणाईच्या साक्षरतेची प्रत काय असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 2019 चा 'आंतरराष्ट्रीय युवक दिन' म्हणजेच 12 ऑगस्ट हा याच तरूणाईला सर्वसमावेशक व न्याय्य गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करण्यावर आणि नव्या शिक्षणाच्या संधींना प्रोत्साहन देण्यावर केंद्रित आहे.
शल्याधारीत तरुण पिढी घडवणं जगासमोरील आव्हान... 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेनं १२ ऑगस्ट रोजी पहिला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला. बदलाचे भागीदार असणाऱ्या युवक-युवतींचा वार्षिक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. युवकांसमोरील जागतिक आव्हानं, समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याची एक संधी म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. 'शिक्षणामध्ये बदल' ही 2019 च्या आंतरराष्ट्रीय युवक दिनाची थीम आहे. त्याला अनुसरून शासन, तरुणाई, युवा-केंद्रित संस्था तसंच इतर भागधारक कशा पद्धतीनं शिक्षणाचा कायापालट करण्यासाठी हातभार लावत आहेत, हे अधोरेखीत केलं जाईल.
कौशल्याधारीत तरुण पिढी घडवणं जगासमोरील आव्हान... शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शिक्षणाचं सर्वसमावेशक असणं आणि ते सहज उपलब्ध होणं ही महत्त्वाची अट आहे. शिक्षण हे विकासाचं 'गुणक' आहे. कारण, ते दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, लिंग समानता, सामाजिक असमानता, हवामान, शांततापूर्ण समाजजीवन अशा सर्व विकासात्मक उद्दीष्टांची पूर्तता करण्यात महत्वाची भूमिका बजावते. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक प्रवाहात टिकण्यासाठी जगाच्या लोकसंख्येत सिंहाचा वाटा असणाऱ्या तरूणाईला शाश्वत शिक्षणाकडे नेणं आवश्यक आहे.
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम, मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा(आरटीई) यांसारख्या योजनांच्या अंमलबजावणीद्वारे प्रत्येकाला शिक्षण सुनिश्चित करण्याच्या बाबतीत भारतानं महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ सर्व मुलांना आता एक किलोमीटरच्या परिघात प्राथमिक शाळा उपलब्ध आहेत. शाळाबाह्य मुलांची संख्या जी 2009 मध्ये अंदाजे आठ दशलक्ष होती ती 2014 पर्यंत सहा दशलक्षांवर आली, असं सरकारी नोंदी सांगतात. असं असलं तरीही शासनानं निश्चित केलेलं '2015 पर्यंत सर्वांना प्राथमिक शिक्षण' हे उदिष्ट आपण अद्यापही पूर्ण करू शकलो नाही. प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण करण्यापूर्वीच एक तृतीयांश मुलं शााळा सेडतात. शाळेत प्रवेश नसलेली बहुतेक मुलं ही अनुसूचित-जमाती, धार्मिक अल्पसंख्याक, अपंग यांच्यासह असुरक्षित आणि उपेक्षित गटातील आहेत. त्यामुळे भारतात शैक्षणिक आव्हानांमध्ये प्रवेशापलीकडे जाऊन शिक्षणाचा दर्जा आणि समानता सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
कौशल्याधारीत तरुण पिढी घडवणं जगासमोरील आव्हान... विद्यापीठ स्तरावर कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमाचा अभाव, हे भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी भाषा, विज्ञान, गणिताच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रभावी रचना आणि वितरण होणं महत्त्वाचं आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या तरूणांसाठी वेब आधारीत शिक्षण(ई-लर्निंग), दुरस्थ शिक्षण(डिस्टंट एज्यूकेशन), व्हिडिओ कोर्स यांसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षणावर शासनाकडून भर दिला जात आहे. मात्र, या सर्व पर्यायांकडे तरूणाई संधीच्या नव्हे तर केवळ कागदोपत्री पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने पाहते. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासेबतच प्रयोगशील दृष्टीकोन घेऊन काम करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं भारतासारख्या विकसनशील देशासाठी अनिवार्य आहे.
कौशल्याधारीत तरुण पिढी घडवणं जगासमोरील आव्हान... आज मिळालेल्या शिक्षणाचा परिणाम तरुणांच्या संपूर्ण आयुष्याभर टिकणारा असेल. शैक्षणिक आव्हानांसोबत दोन हात करण्यासाठी जितक्या वेगानं काम केलं जाईल, त्याच वेगाने भारतातील तरूणांचं भविष्य उज्ज्वल होण्यास हातभार लागेल. ईटीव्ही भारत कडून सर्व युवकांना आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या शुभेच्छा!