दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी विविध उपक्रमांद्वारे अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात येते. तसेच, व्यसनमुक्तीला चालना देण्यासाठीही वेगवेगळ्या उपक्रमांचे, शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
१९८७ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली. २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अमली पदार्थ आणि गुन्हेगारीसंबंधी विभागाने जारी केलेल्या वर्ल्ड ड्रग रिपोर्टनुसार, जगभरातील प्रौढ लोकांपैकी सुमारे ५.३ टक्के लोकांनी २०१५च्या वर्षभरात किमान एकदातरी अमली पदार्थाचे सेवन केले होते. यांपैकी सुमारे तीस दशलक्ष (किंवा ०.६ टक्के) लोक हे अमली पदार्थांच्या पूर्णपणे आहारी गेले होते.
योग्य उपाययोजनांसाठी योग्य माहिती -
दरवर्षी हा दिवस एखाद्या विषयाला अनुसरून साजरा करण्यात येतो. २०१९मध्ये या दिवसाची थीम 'हेल्थ फॉर जस्टिस, जस्टिस फॉर हेल्थ' अशी होती. यावर्षीची थीम आहे - 'बेटर नॉलेज फॉर बेटर केअर!' म्हणजेच; योग्य उपाययोजनांसाठी योग्य माहिती. अमली पदार्थांबाबत सामान्य लोकांना जास्त माहिती नसते. त्यामुळेच अशा पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर कशा प्रकारे उपचार करावे, किेवा त्यांना कशा प्रकारची वागणूक द्यावी याबाबतही लोकांमध्ये जागरुकता नसते. या आजारांबाबत जेवढी जास्त माहिती लोकांना असेल, तेवढ्या चांगल्या प्रकारे जागरुकता करता येईल. त्यामुळेच, यावर्षी बेटर नॉलेज फॉर बेटर केअर अशी थीम आयोजित करण्यात आली आहे.
देशातील परिस्थिती -
फेब्रुवारी २०१९मध्ये, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एआयआयएमएस) राष्ट्रीय औषध अवलंबन उपचार केंद्राने (एनडीडीटीसी) एक अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये पुढील गोष्टी समोर आल्या -
-देशात १० ते ७५ वयोगटामधील साधारणपणे १४.६ टक्के लोक (सुमारे १६ कोटी) हे अल्कोहोल म्हणजेच दारुच्या आहारी गेले आहेत.
-गेल्या वर्षभरात देशातील २.८ टक्के (३.१ कोटी) लोक हे कॅनाबीज म्हणजेच भांगसदृश्य अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.
-याबाबतचे सर्वेक्षण करताना, २.०६ टक्के लोकांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते असे आढळून आले. साधारणपणे देशातील एकूण लोकसंख्येपैकी ०.५५ टक्के लोकांना आपल्या अमली पदार्थांच्या व्यसनासंबंधी मदतीची गरज आहे.
-देशातील सुमारे ८.५ लाख लोक हे इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ घेतात असेही या अहवालात म्हटले आहे.
पंजाबमधील परिस्थिती -
देशातील अमली पदार्थांच्या व्यसनाचा सर्वाधिक फटका हा पंजाब राज्याला बसला आहे. पंजाबमधील ७५ टक्के तरुणवर्ग हा विविध व्यसनांच्या जाळ्यात अडकलेला दिसून येतो. एका अहवालानुसार, एक तरुण व्यक्ती आपल्या व्यसनासाठी दिवसाला १,४०० रुपये खर्च करतो. पंजाब राज्य सीमेवर असल्यामुळे, परदेशातून तस्करी करून अमली पदार्थ देशात आणण्यासाठी हा सोपा मार्ग ठरत आहे. मित्रांच्या प्रभावामुळे किंवा तणावामुळे 'एकदाच' घेतलेले अमली पदार्थ कधी व्यसन होते, हे तरुणांच्या लक्षात येत नाही. शिवाय पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीही या आगीत तेल ओतण्याचेच काम करताना दिसून येत आहे. गाण्यांमधून अमली पदार्थांचे सेवन करणे कसे 'कूल' आहे, हे वारंवार दाखवले जाते. यामुळे तरुणांमध्ये अमली पदार्थांबाबत आकर्षण निर्माण होताना दिसून आले आहे.
व्यसनाधीन व्यक्ती कशी ओळखाल..?
तुमच्या घरातील किंवा ओळखीतील एखादी व्यक्ती अमली पदार्थांच्या आहारी गेली आहे, की नाही हे ओळखणे सहज शक्य आहे. अशा व्यक्तींमध्ये पुढील लक्षणे दिसून येतात -