नवी दिल्ली :गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ८०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४२ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,०१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ७१ हजार ६४२ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ४२ लाख ०४ हजार ६१४ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख ८२ हजार ५४२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत ३२ लाख ५० हजार ४२९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
ब्राझीललाही टाकले मागे..
दरम्यान, वर्ल्डोमीटर या संस्थेच्या माहितीनुसार जगभरात कोरोना रुग्णसंख्येमध्ये भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेले काही दिवस अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, काल झालेल्या रुग्णवाढीनंतर, देशाने ब्राझीलला मागे टाकले आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक (६४,६०,२५०) रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ भारत (४२,०४,६१४) आणि ब्राझीलचा (४१,३७,६०६) क्रमांक लागतो. असे असले, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बळींच्या संख्येत भारत या दोन्ही देशांच्या बराच मागे आहे.
दरम्यान, काल दिवसभरात ७ लाख २० हजार ३६२ कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या ४ कोटी, ९५ लाख, ५१ हजार ५०७ एवढी झाली आहे.