नवी दिल्ली - भारतीय लष्कराने सोमवारी एका ट्विटमधून 'हिममानव' अस्तित्वात असल्याचे संकेत दिले आहेत. अशा प्रकारच्या व्यक्तीला भारतीयांनी 'यती' असे नाव दिले असून त्याविषयी अनेक कल्पना आहेत. आता भारतीय लष्कराने अशा महाकाय व्यक्तीच्या पाऊलखुणा असलेली छायाचित्रे ट्विटरवरून शेअर केली आहेत. यामुळे 'खरोखरच हिममानव अस्तित्वात असेल काय,' अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
भारतीय लष्कराने त्यांच्या पर्वतारोहण अभियान दलाने ९ एप्रिलला मकालू बेस कॅम्पजवळ ३२x१५ इंचांच्या पाऊलखुणा पाहिल्या. त्याची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. रहस्यमयी हिममानव 'यती'च्या पावलांच्या या खुणा असतील का, याविषयी चर्चा आहे. याआधी हा रहस्यमयी आणि पटकन निसटून निघून जाणारा हिममानव मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये पाहण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.